Wednesday, July 20, 2016
द्रोणाचार्यांचा अंगठा
द्रोणाचार्यांचा अंगठा
एकलव्य हा द्रोणाचार्यांचा शिष्य होता का नाही ? तो नसेल त्यांच्या वर्गात, पण त्याने त्याच्या मनाने त्यांची मूर्ती स्थापून त्यापुढे धनुर्विद्येचे शिक्षण घेतले नव्हते का ? त्याने नुसते कबूलच नाही, तर गुरुदक्षिणा म्हणून अंगठाही कापून दिला होता, म्हणजे द्रोणाचार्यांच्या विचारांशी तो संपूर्ण सहमत होता. समजा मी इंटरनेट वर कोणा गुरूकडे शिकलो तर तोही समक्ष कुठे हजर असतो ? पण तरीही मी त्याचा शिष्यच नाही का ?
असेच नथुराम गोडसे समजा नसतील त्यावेळी आरएसएस मध्ये, पण त्यांचे विचार तसेच असतील तर ते आरएसएसचे होते का नव्हते ? जसे कोणी अप्रत्यक्षरित्या हिंसेचे समर्थन केले तरी तो हिंसेला तितकाच जबाबदार. जशी हिंसा कित्येक वेळा क्रिमिनल असते तशीच अहिंसा कित्येकवेळा क्रिमिनल असू शकते. जसे, माझ्या समोर खून होतोय, मी खुन्याला पकडू शकतोय पण अहिंसेच्या नादापायी मी ते करीत नाही, तर इथे अहिंसा क्रिमिनल नाही का होत ? मग मलाही अंगठा द्यायला पाहिजे !
संस्था विचारांचे संस्थीकरण करीत असतील व संस्था दोषी असतील तर मग विचारांचे काय ? ते नाही का सदोष ? आणि ते धारण करणारे संस्थेबाहेरचे पण दोषी ? त्यांनी नाही का द्यायचा अंगठा ?
Sunday, July 17, 2016
नेति नेति नास्तिक
नेति नेति नास्तिक
-----------------------
म्हणतात की देवाची व्याख्या करताना न + इति = नेति नेति असे म्हणतात. म्हणजे देव कसा ? तर असा नाही, असा नाही ...असा !
उदाहरणच घ्यायचे तर आपल्या डोळ्याने पाहण्याचे घ्या. म्हणे आपल्या डोळ्यात दोन भोके आहेत, जिथे आपल्याला न दिसले पाहिजे व प्रत्येक देखाव्यात ही दोन भोके दिसली पाहिजे होती. पण असे होत नाही कारण म्हणे मेंदूत अशी न्युरोन मंडळी बसली आहे की जी आपल्याला पटवते की असेच सगळीकडे दिसते आहे व भोक बिक काही नाही. हे असे होते हे कळले, पण हे न्युरोन हे कसे पटकन करतात ते अजून कळले नाही म्हणतात. असेच म्हणे आपल्याला दोन मितीतच दिसते, पण मेंदूत ते तीन मितीत परिवर्तीत होते. कसे ? कदाचित त्यालाच ठावूक !
जिथपर्यंत कळते तिथपर्यंत मेंदूचा जय ! आणि जिथे समजत नाही तिथे ? कदाचित त्यालाच ठावूक !
एखादी गोष्ट केवळ काही मिलि सेकंड पाहिली आणि क्षणात ती कळली, असे होते खरे. पण कसे हे होते ? कदाचित त्यालाच ठावूक !
---------------------
उ चा उकल
उ चा उकल
उपोद्घात व उपसंहार हे निश्चितच अवघड शब्द आहेत, म्हणायला व लिहायला. त्यामुळे ह्यांना पर्याय असलेले शब्द आपण ज्यास्त वापरणे साहजिक आहे. पण हे शब्द अवघड का झाले असावेत ?
वा.गो.आपटे ह्यांच्या शब्द-रत्नाकर ह्या शब्दकोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत. त्यापैकी ५८८८ शब्द स पासून सुरू होणारे आहेत. उ पासून सुरू होणारे शब्द आहेत केवळ १२४८ व त्याचा क्रम २१वा लागतो इतका हा शब्द नकोसा आहे.
उ पासूनचे जे १२४८ शब्द आहेत त्यात २५८ शब्द नकार, तिरस्कार दाखवणारे आहेत ( २०%). शब्दकोशात उ समोर शेरा आहे : नापसंती किंवा तिरस्कार दर्शविणारे उद्गारवाचक अव्यय. असेच संस्कृत शब्दकोशात उ समोर अर्थ आहे : an interjection of compassion, anger, L.तेव्हा उ ह्या अक्षराचे कर्तब तिरस्कार दाखवते व ते उदाहरणार्थ दाखवणारे शब्द आहेत : उकरडा, उखाळी-पाखाळी, उगारणे, उगीच, उग्र, उचकटणे, उचलेगिरी, उचापत, उच्छिन्न, उठवळ, उंडारणे, उणीव, उताडा, उतावळ, (उत्कृष्ट हे अपवाद), उथळ, उद्धट, उनाड, उधार, उपट, उपद्रव, उपसर्ग, उलट, उष्टे, उशीर, उष्मा...वगैरे.
ह्या उलट प्र पासून सुरू होणारे एकूण ८४४ शब्द आहेत व त्यापैकी २६५ ( ३१%) हे प्रशंसात्मक आहेत. त्यामुळे उपोद्घात ऐवजी प्रस्तावना हे ज्यास्त रूढ होण्याजोगे आहे. शिवाय त्यात स्तवन चा भाव आहे.
-------------------
Friday, July 15, 2016
मंत्रालय
मंत्रालय
----------
इति + आदी = इत्यादी
नेत्र + आलय = नेत्रालय
मुत्री + आलय = मुत्रालय
मुत्र + आलय = मुत्रालय
छत्री + आलय = छात्रालय ( छ्त्र्यालय नाही )
मंत्री + आलय = मंत्र्यालय = मंत्रालय
मो. रा. वाळंबे ह्यांच्या सुगम मराठी व्याकरण लेखन ह्या पुस्तकात संधी ह्या प्रकरणात एक टिप्पणी आहे : मराठीचा कल संधी करण्याकडे नाही. संधी न घेणे ह्या मराठी वृत्तीवर हा अप्रतीम शेरा आहे. कदाचित आपण मराठी लोक हे प्रकरण ऑप्शनला टाकत असूत.
---------------
पावण्याचा संकेत
पावण्याचा संकेत !
------------------
बॅंकॉक ला नोकरी निमित्त असताना शहरातल्या मध्यवस्तीत असलेल्या एका देवीच्या हिंदू देवळात प्रचंड थाई लोक ( हे चीनी, बौद्ध धर्माचे ) येत असत. एक दोघांशी ओळख झाल्यावर असे का विचारल्यावर त्यांनी चक्क कबूल केले की तुमचे देव फार पॉवरफुल असतात म्हणून. आता पॉवरफुल कसे, तर तिथे ठेवलेल्या आकड्याच्या काड्या असतात एक नळकांड्यात व त्या हे दर्शन झाल्यावर खुळखुळवत पाडतात व त्या आकड्यावर ते सट्टा खेळतात व तो हमखास लागतो म्हणून तुमचे देव पॉवरफुल !
ह्याचा खरच शास्त्रीय विचार करायचा असेल तर खूप शोध-निबंध आहेत, प्लासीबू इफेक्ट वर ते वाचावेत. प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे की आपण जी औषधे घेतो त्याने बरे वाटेल ह्या विश्वासावरच आपले आजार बरे होतात. औषधे केवळ ४० टक्केच लागू होतात, बाकीचे श्रेय आपल्या अपेक्षेला असते. अजून वाचायचे असेल तर मुसलमानांचा फर्टिलिटी रेट दर बाई मागे ३.१ मुले व हिंदूंचा फर्टिलिटी रेट दर बाई मागे २.३ मुले असे का ह्यावरचे शोध निबंध वाचावेत. चार बायका असल्या तरी हा रेट दर बाईमागे मोजल्याने त्याचा संबंध राहत नाही. हिंदुचेच हे मुसलमान झालेले आहेत, मग हे ज्यास्त का फळतात ? तर संशोधन सांगते की तशा त्यांच्या अपेक्षा असतात म्हणून.
तर खरे दैवत अपेक्षा हे आहे ! कुठल्याही मोटीव्हेशनिस्टला विचारा तो सांगेल की जोवर तुम्ही काही मागत नाही तोवर काही प्रगती होत नाही. अपेक्षा हे दैवत हे सगळ्यात ज्यास्त पावणारे आहे.
-----------------------
Wednesday, July 13, 2016
ठुल्ला
ठुल्ला
न्यायाधीशांनी खरे तर हा प्रश्न केजरीवाल ह्यांना विचारलाय की “ठुल्ला” म्हणजे काय ? ....पण आपण अर्थ सांगायला काय हरकत ?
भाषाशास्त्र सांगते की नुसत्या शब्दांना अर्थ नसतो, सगळा समाज, संस्कृती मिळून त्याला तो अर्थ देतात व तो अर्थ कुठल्याही नियमाशिवाय येतो. खरे तर शब्द ह्याची व्याख्याच अशी करतात की अक्षरांचा असा समूह की ज्याचा काही तरी अर्थ होतो. आता “ठुल्ला” हा शब्दकोशात सापडत नाही म्हणून तो शब्दच नाही असे आपण म्हणू शकत नाही, कारण त्याला अर्थ आहे. काय अर्थ असावा ?
अभिनव गुप्त ह्यांच्या तंत्र-शास्त्र प्रमाणे प्रत्येक अक्षराला अर्थ असतो व त्याचे एक दैवतही असते. ठ ह्या अक्षराचे दैवत आहे “शिस्न”. ठ पासून सुरू होणारे एकूण ३०७ शब्द आहेत ( वा.गो.आपटे ह्यांच्या शब्द-रत्नाकर ह्या शब्दकोशात ). त्यापैकी २०० नकारी अर्थाचे आहेत. म्हणजे ७० टक्के. म्हणजे ठुल्ला हे नकारी असणे ज्यास्त संभवनीय. ( अर्थात अपवाद आहेत : ठराव, ठरवणे, ठणठणीत, वगैरे ).
हिंदीत शिस्नला बोली भाषेत “बुल्ला” असेही म्हणतात. ह्या शब्दात ल्ला चा इतका दाट परिणाम आहे की बु ऐवजी दुसरे कुठलेही अक्षर टाकले तरी अर्थात वाईटाची झांक राहते. ( ती फक्त अजून एकदा नकारी करणारे अक्षर अ जोडून त्याचा अल्ला केल्यावरच दूर सरते.).
आपण नवीन शब्द करतो तेव्हा त्याला सर्वानुमते एक अर्थ येतो. आणि ठुल्ला ला नक्की वाईटच अर्थ आहे एवढे नक्की !
--------------------