------------------------------------
"ळ" चे लळित !
-----------------------------------
"ळ" हा मराठी वर्णमालेतला मोठा स्पेशल वर्ण आहे. इतर लोकांना ह्या "ळ" मुळेच मराठी बोलायला अवघड जाते. व्याकरणाच्या पुस्तकात ह्याला स्वतंत्र वर्ण म्हणून मानल्या जाते. तसेच ळ चा उच्चार करताना जिभेचा शेंडा कठोर तालू व कोमळ तालू यांच्या मधल्या भागाला म्हणजे "मूर्धा"ला लागल्यावर होतो व म्हणून त्याला "मूर्धन्य" म्हणतात. ळ ला पर्याय म्हणून ल हा वर्णही आपण वापरतो. हा ल अर्धस्वर असून मृदू असतो. जसे कमल किंवा कमळ, निर्मल किंवा निर्मळ, सरल किंवा सरळ, सकल किंवा सकळ, बाल किंवा बाळ, माला किंवा माळा, संध्याकाल किंवा संध्याकाळ, वगैरे. पण अर्थाच्या दृष्टीने पाहिले तर ळ मुळे एक प्रकारचा ठसठशीतपणा किंवा टोकाची भावना जाणवते. जसे सरल पेक्षा सरळ हे ज्यास्त सीधेपणाचे असते, निर्मल पेक्षा निर्मळ ज्यास्त निर्मळतेचे असते, फल पेक्षा फळ ज्यास्त फळणारे आहे, खल पेक्षा खळ हा ज्यास्त खलनायकी थाटाचा असतो. पूर्वी कमळ ज्यास्त वापरातले असल्याने मुलांचे नाव कमळाकर असायचे तर आताशी त्याचे कमलाकर करतो, हिंदी "चोली" पेक्षा मराठी "चोळी" ही ज्यास्त ठसठशीत वाटते, "बगळ्यांची माळ" कोमल भासावी म्हणून कवीच्या सोयीसाठी आपण "बलाकमाला" हा शब्द रास्त ठरवतो तर "बलाकमाळा" गैर मानतो, वगैरे.तर सारांशाने म्हणता येईल की ल वापरून आपण जे शब्द करतो त्यात वरचे, अधिकाचे परिमाण, वरची पातळी ( डिग्री ) दाखवायची असेल तर ती ळ वापरल्याने साधते. उच्चारशास्त्रात ल हा अर्धस्वर तर ळ हा स्वतंत्र वर्ण मानताना हीच वरची पातळी दाखविण्याचा प्रयत्न असावा. हाच "ळ" चा वरच्या पायरीचा अर्थ म्हणता येईल. पूर्वी भजनांनंतर एक मनोरंजक नाटक असे ज्याला लळित म्हणत. "ळ" चे मराठीत असेच लळित आहे !
--------------------------
अरुण अनंत भालेराव
--------------------------------------
Thursday, July 21, 2016
ळ चे लळित
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment