Friday, July 22, 2016

वदनी कवळ घेता

------------------------------------
वदनी कवळ घेता...
----------------------
परंपरा ही आपल्याला बहुदा यांत्रिक करीत असावी. कारण वदनी कवळ घेता...ह्या जेवणाच्या वेळेस म्हणण्याच्या श्लोकाचा काय अर्थ असावा असा कधी आपल्याला प्रश्नच पडत नाही. काय असेल ह्या श्लोकाचा अर्थ ?
अर्थातच हा भक्तीमार्गाच्या ऐन सुवर्णकाळात रचलेला श्लोक असावा. कारण ह्यात देवाचे नाव श्रीहरी असे आहे. जेवताना घास घेताना श्रीहरीचे नाव घ्यावे असे म्हटले आहे. हे घेतल्याने सहज हवन होते, अगदी फुकटचे, असे जे म्हटले आहे ते पचण्याच्या दृष्टीने म्हटलेले नाही तर "हवन" जे यज्ञकार्यात करतात त्या रूपकाने म्हटलेले आहे. अन्न/घास आपल्याला शक्ती पुरवितो हे वैज्ञानिक कारण इथे दाखवलेले नाही कारण वैज्ञानिक दृष्टिकोण वगैरे बाबी खिजगणतीतच नव्हत्या तेव्हा. तसेच ह्यातले "होते" हे होणे ह्या क्रियापदाचे भूतकालवाचक रूप नसून अग्नीला जे "होता" असे म्हणत ते असावे. कारण इथे हवन आहे यज्ञातले.
"जिवन करी जिवित्वा" ह्या ओळी आधी पूर्णब्रह्म म्हणजे काय हे जाणू. शंकराचार्यांच्या केवलाद्वैतवादात हे ब्रह्म प्रकरण येते. सगळेच ब्रह्म असते. तुम्ही आम्ही सगळे. आणि माया मिथ्या असते असे ऐकलेले स्मरत असेलच. आता एकनाथांच्या भागवताकडे वळू. मायेचे वर्णन करताना एकनाथ ( अध्याय ३-६९,७०  ) म्हणतात, "आता कांही एक तुझ्या प्रश्नीं । माया सांगो उपलक्षणी । सर्गस्थित्यंतकारिणी । त्रिविधगुणी विभागे ॥ जेवीं सूर्यासी संकल्पु नसे । तरी नसता त्याच्या ठायी दिसे । जेव्हा का निजकिरणवशें । अग्निप्रकाशे सूर्यकांती ॥ तेवीं शुद्धस्वरूपी पाही । संकल्पमात्र काही नाही । नसतचि दिसे ते ठायी । ते जाण विदेही "मूळमाया" ॥"
आता ही जर माया आहे तर केवलाद्वैतवादातले ब्रह्म कसे ? तर एकनाथ सांगतात,( अध्याय ३-८५-  ) "एशीं स्त्रजिलीं भूतें महाभूतें । जी जड मूढ अचेतें । त्यांसी वर्तावया व्यापारार्थे । विभागी आपणाते तत्प्रवेशीं ॥ पंचधा पंचमहाभूतें । ते कार्यक्षम व्यावया येथे । पंचधा विभागे श्रीअनंते । प्रवेशिये तेथे तें एक राया ॥ "गंध"रूपें पै पृथ्वीतें । प्रवेशोनि श्रीअनंते । पूर्ण क्षमा आणोनि तीतें । चराचरभूतें वाहवी स्वयें ॥ पृथ्वी प्रवेशिला भगवंतु । यालागी आवरण-जळांतु । उरलीसे न विरतु । जाण निश्चितु मिथिलेशा ॥ धरा धरी धराधर । यालागीं विरवूं न शके समुद्र । धराधरें पृथ्वी सधर । भूतभार तेणे वाहे ॥ "स्वाद" रूपे उदकांते । प्रवेशोनि श्रीअनंते । द्रवत्वें राहोनिया तेथे । जीवनें भूतें जीववी सदा ॥ जीवनीं प्रवेशे जगज्जीवन । याकारणें आवरण तेंचि जाण । न शोषिता उरे जीवन । हे लाघव पूर्ण हरीचे ॥ " म्हणजे जे ब्रह्म ( चैतन्य ) आहे ते आधी गंध रूपाने पृथ्वीत आले आहे ( घासाचा वासच उद्युक्त करतो ) मग चैतन्य हे स्वाद रूपाने आपल्या शरीराच्या उदकात ( आपल्या टेस्ट-बडस्‌ ह्या द्रवच निर्माण करतात ) वसते आहे, व हे उदक आपल्या जीवनाला जीवनदान देते आहे. ( जीवाची उत्पत्ती जलातून झाली हे इथे आपल्याला आठवावे ). हेच ते जिवन करी जिवित्वा . आणि ह्या खाण्याला आपण ह्याच साठी उदरभरण नोहे समजून हे यज्ञकार्य समजून त्या पूर्ण ब्रह्माची/श्रीहरीची आठवण ठेवावी.
----------------------------------------

No comments:

Post a Comment