हाडाचा टण्णू !
-------------------
हैद्राबादला असताना रीतीप्रमाणे आम्ही लहान मुले गोट्या खेळत असू. बहुतेक गोट्या कांचेच्या असत व त्यात रंगीत फुले असत. पण सगळ्या गोटी बहाद्दरांचा अनभिक्षित राजा एक तेलुगु मुलगा होता. त्याच्याकडे एक पांढरी शुभ्र व जड अशी गोटी होती, जी तो इतक्या जोरात हाणी की कांचेच्या गोट्या चक्क फुटत असत. त्याला त्या काळी पोरं टण्णू किंवा बट्ट्या म्हणत. ही गोटी हाडाची केलेली असे व तो मुलगा एका हाडाच्या कारखान्यातून ती घेवून येई.
त्या टण्णूचा आम्हाला फार हेवा वाटे. कारण त्याच्या समोर बाकीच्या गोट्यांचा अजिबात टिकाव धरत नसे. हा हेवा कधी कधी आम्हाला स्वप्नात हाडाच्या कारखान्याला घेवून जाई व आम्ही कल्पनेने हाडाच्या तलवारी, जम्बिये, हाडाची पिस्तुले वगैरे बनवून अनेकांशी जिंकण्याची स्वप्ने पहात असू.
त्यानंतर आमचा काका जेव्हा मेडिकलला होता तेव्हा हातापायाची मोठी हाडे आम्ही जवळून पहात असू. काका त्यावर रंगीत पेन्सिलीने निळ्या लाल शिरा काढीत असे. त्याला म्हणे परीक्षेत हाडे ओळखून त्याची माहिती द्यावी लागे. तसा तो हाडाचा विद्यार्थी होताच !
पुढे होस्पेटला असताना एका सोन्याच्या खाणीत गेलो असताना तिथल्या एकाने आपल्या हाडात सुद्धा कसे सोने असते त्याची माहिती दिली होती. त्याने तर हाडाच्या टण्णूचा आमच्या मनातला मान अधिकच वाढला ! जीवनात काही व्हायचे असले तर व्हावे हाडाचा टण्णू !
------------------------
No comments:
Post a Comment