Thursday, July 7, 2016

नेमस्त

नेमस्त , भिडस्त , समस्त , शिकस्त , फस्त , हस्त , दस्त , जबरदस्त, मस्त अस्त, नेमस्त म्हणजे मवाळ. हा झाला वापरातला अर्थ. पण शब्दकोशात नेमका, निश्चित, मर्यादेतला , बरोबर, असेही अर्थ दिलेले आहेत. नेम म्हणजे खूण, लक्ष्य असा अर्थ असताना “नेमस्त” मध्ये त्या खुणेत वावरणारा असा अर्थ यावा हे साहजिक आहे. मग इथे “अस्त” म्हणजे शेवट असा अर्थ आलेला आहे का अस्तु म्हणजे “आहे” अशा अर्थाने “नेम आहे ” असे नेमकेपणाचे हे गमक आहे ? दोन शब्दांचा मिळून एक शब्द असेल तर त्यातल्या एकाचा वा दोन्हींचा अर्थ त्यात यावा असे काही निश्चित धोरण भाषेत असत नाही. कारण नेमका हा शब्द कोठून आलेला आहे ते महत्वाचे असते. ज्या शब्दात शेवटी “स्त” आहे असे शब्द बहुदा फारशी भाषेतून आले आहेत असे आढळते. जसे : फस्त , शिकस्त, मस्त, दस्त, जबरदस्त वगैरे . त्यामुळे शब्दातला एक भाग मराठी शब्द व दुसरा फारशी असे अनेक शब्द मराठीत वसून आहेत. ( उदा: दंगामस्ती, थट्टामस्करी, धनदौलत, मानमरातब, रीतीरिवाज, अंमलबजावणी, कागदपत्र, खर्चवेच, मेवामिठाई, बाजारहाट, अक्कलहुशारी, डावपेच , जुलूमजबरी वगैरे ) त्यामुळे “नेमस्त” शब्दातला मवाळपणाचा अर्थ हा ह्या शब्दात त्याच्या फारशीपणातून आला असावा. त्याला नेमके ओळखण्यासाठी “फारशी” अक्कलहुशारीच लागेल. --------------------------------------------

No comments:

Post a Comment