Thursday, July 7, 2016

वाद व मतपरिवर्तन

-------------------------------
वाद व मतपरिवर्तन
-----------------------
ज्यूडिथ हॅरिस नावाची एक विदुषी बाई आहे, मानसशास्त्रज्ञ. तिचे एक शोध निबंधाचे पुस्तक आहे "नर्चर ऍझंप्शन " ( व्हाय चिल्ड्रेन बिहेव्ह लाइक धिस, नेचर विरुद्ध नर्चर ह्या वादावरचे हे पुस्तक आहे. ) नावाचे. त्यात तिने मुलांवर कोणाचा परिणाम होतो त्यासंबंधीची शास्त्रीय निरिक्षणे दिली आहेत. त्यात चक्क म्हटले आहे की मुले आई-वडिलांचे ऐकत नाहीत, मास्तरांचे ऐकत नाहीत, समाजाचे ऐकत नाहीत....तर मग ऐकतात तरी कोणाचे ? तर, पियर्स म्हणजे ज्या ज्या काळी जे म्होरके असतात त्यांचे !
आपण अनुभवाने शिकत असू असे आपल्याला वाटते खरे, पण आयुष्यभर आपण चुकाच करीत आलो आहोत हे जेव्हा कळते तेव्हा अनुभवाने शहाणे होण्यावरचा विश्वास लगेच उडतो.
बंडखोरीने आपण काही शिकत असू असे म्हटले तर नुसती बंडखोरीच आपली चालली आहे, वेगळे मत मांडले पण त्यावरचा अभ्यास, समर्थन वगैरे काही आपल्याला कधी गवसतच नाही.
लहान मुले ऐकत असतील म्होरक्यांचे पण आपण मोठी माणसे ऐकतो का त्यांचे ? नुसत्या फेसबुकावरच्या पोस्टी पाहिल्या तर चार माणसांचे, शंभर विचार, पाहून कोण कोणाचं ऐकत नाहीय हेच प्रकर्षाने दिसेल.
वादे वादे च्या उलटे जसे देवा देवा होते; तसेच वाद च्या उलटे दवा होते.  पण हा दवा कोणालाच लागू कसा होत नाही. मार्क्सवाद म्हणजे एका विचारांची "वाट" समजले तर काही वर्षातच त्याची लागलेली "वाट" पाहून हे वाद किती बिन-असरदार आहेत ते पटते. बरे त्यांच्याच पक्षातली मंडळी त्यांच्या म्होरक्यांचे ऐकत नाहीयेत तर दुसरे कोण ऐकायला बसलेत ? ( जसे: शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांचे कान उपटले की जाहीर लग्नाचा खर्च इतका करू नये ! ).
गंमत म्हणजे प्रत्येकाला वेगळेच दिसत असते. काहींना वारीत भक्तीमार्गाची भावना दिसते तर काहींना वारीत होणारी घाण दिसते. ( आता आपण नुसते ज्या शहरात राहतो तिथे किती घाण करतो ते परत तिसर्‍यालाच कुणाला दिसत असते ! ) .
तेव्हा....मत-परिवर्तन होत नसते, काही अज्ञात शक्तींनी आपली मते बनत जातात हेच खरे असावे !
------------------------------------

No comments:

Post a Comment