Thursday, August 11, 2016

गर्भित अर्थ

गर्भित अर्थ
-----------------
    पेपरात एक बातमी : "ऐश्वर्या राय गर्भावस्थेत" अशी. इथे "गर्भावस्था" ह्या शब्दातली चूक लक्षात येत नाही. ह्याचा काटेकोर अर्थ: ऐश्वर्या ही स्वत: गर्भात असतानाच्या अवस्थेत ( म्हणजे तिची आई गरोदर असतानाची अवस्था ) .कदाचित "गर्भार-अवस्थेत" असे ठेवले असते तर ते बरोबर ठरले असते.
    "ऐश्वर्या राय प्रेग्नन्ट" अशा अर्थाची बातमी द्यायची होती हे तर उघडच आहे. "प्रेग्नन्ट" ला मराठीत पर्यायी शब्द आहेत: गरोदर, गर्भवती,गर्भार, गर्‍व्हारशी, पोटुशी. ह्यातला एकही बरोबर शब्द न वापरता, "गर्भावस्थेत"ने ती प्रेग्नन्ट आहे असे चुकीच्या शब्दाने कसे कळले ? 
    आता गरोदर ह्या शब्दाची फोड केली तर गुरू+उदर म्हणजे ज्या बाईचे उदर मोठे आहे ती, असा नेमका अर्थ व्हायला पाहिजे. ढेरपोट्या बाईला आपण काही गरोदर म्हणत नाही. पण गरोदर म्हणजे ती बाई "प्रेग्नन्ट" आहे हेच कळते. गर्भार म्हणजे गर्भाच्या भाराने असलेली असा अर्थ केला तर "गर्भाचा भार" का "गर्भाचे आभार" अशा वेगवेगळ्या मतांच्या माता ह्या अर्थाला नाकारतील. "गर्‍हवारशी" किंवा "पोटुशी" हे नेमके अर्थाचे शब्द असले तरी आपण इतके वापरीत नाही. "गर्भवती" आजकाल कोणी वापरीत नाही.
    जिथे स्त्रिया बाळंत होतात तिथे, आकडेवारीने गर्भपात प्रसूतीपेक्षा ज्यास्त होत असले तरी आपण त्याला "प्रसूती-गृह" ह्या नावानेच ओळखतो. बाळ,बाळंतीण सुखरूप आहेत, असे म्हणताना बाळाला जन्म दिलेली "बाळंतीण" असाच अर्थ आपल्या मनात येतो. तिथे आपण अंताला दुर्लक्षतो. मराठी भाषेत मूळ धातूचे थोडे शब्द व त्याला प्रत्यय लावून त्याच वर्गातले अनेक वेगवेगळे शब्द करण्याची चाल आहे. जसे गर्भ हा मूळ शब्द घेतला तर, गर्भकोश, गर्भगळित, गर्भगृह, गर्भछाया,गर्भद्वार, गर्भधारणा, गर्भपात, गर्भमूळ, गर्भश्रीमंत,गर्भस्थ, गर्भाधान, गर्भाशय, गर्भार, गर्भारशी,गर्भासन, गर्भिणी, गर्भित, असे अनेक शब्द आपण करतो. संबंध वर्गवारीतले शब्द, आपण एका शब्दानिशी मनात आणतो. ह्यामुळे "ऐश्वर्या राय गर्भावस्थेत" ह्या शीर्षकाचा अर्थ ती गर्भार आहे असा आपण करून घेतला. गर्भित अर्थ असतात ते असे !
----------------------------------
अरुण अनंत भालेराव
-----------------------------

No comments:

Post a Comment