Monday, August 15, 2016

खाज

-----------------
खाज
-------
सायकोलिग्विंस्टिक्स मध्ये आपण जे शब्द उच्चारतो/मनात आणतो त्याबरोबर मेंदूत जी सिनॅप्सेस ( न्युरॉन्सच्या ठिणग्या ) तयार होतात त्याच्या पॅटर्न्सचा अभ्यास करतात. त्यावरून त्यांनी शोधले आहे की आपण जेव्हा नामे, सर्वनामे, विशेषणे वगैरे उच्चारतो तेव्हापेक्षा जेव्हा क्रियापदे उच्चारतो तेव्हा दाट पॅटर्न्स तयार होतात. त्यावरून वाक्यात क्रियापदांचे दाट महत्व आहे हे सिद्ध होतेच शिवाय क्रिया करण्याकडे व त्याकडे लक्ष देण्याकडे आपले खासे ध्यान असते हे दिसून येते. त्यामुळे सगळ्याच क्रिया करताना आपला मेंदू अति सजग असतो व त्याला त्याची जाणीव असते हे ओघाने आलेच.
तर अशा क्रियांपैकीच एक आहे खाजणे वा खाजवणे. त्वचेच्या आत जे रिसेप्टर्स असतात ते त्वचेवर काय चालले आहे त्याची बातमी मेंदूला पोचवतात व त्यावर काय करायचेय तो निरोप मेंदूकडून दुसरी मज्जा घेऊन येते. त्वचेवर दाब पडणे, तपमान जास्त गरम वा थंड असल्याचे समजणे/भाजणे, जखम झाल्यास त्याची तीव्र वेदना होणे, अशा संवेदना होतात. व त्यावरचे उपायही आपला मेंदू त्वरित करतो. वेदना झाल्यास जिथे वेदना होतेय तो भाग दूर जाण्याची कृती घडते. विस्तवात बोट आले व ते भाजले तर ते आपल्या नकळत विस्तवापासून दूर जाते. त्यामानाने जेव्हा खाज उत्पन्न होते तेव्हा त्यावरच्या शमनासाठी खाजवणे ( स्क्रॅच ) होते. वेदनेपेक्षा खाज आपल्याला कमी दु:खाची किंवा कमी महत्वाची वाटत असली तरी त्यावर दूर सारण्याऐवजी आपल्याला तिथे खाजवूनच शमवावी लागते. म्हणजे उपाययोजनेत जास्त मेहनत मेंदूला घ्यावी लागते अशी असते खाज.
अशा महत्वाच्या संवेदनेला आपण जो शब्द योजतो, खाज, तो तरी कसा हे पाहू. मुळात क पासून बरेच प्रश्नार्थी शब्द आपण करीत असतो. जसे : का, केव्हा, कशाला, कधी वगैरे. त्या क च्या योजनेपेक्षाही जरा जोरकस शब्द आपण त्यात ह ( ह्याला महाप्राण म्हणतात ) मिसळून ख करतो. ख चा अर्थच आपण आकाश असा करतो. म्हणजे खाज ही संवेदना कोणाला आकाशाएवढी वाटावी हे फारच संवेदनशीलतेचे वाटते. शिवाय ज ह्या अक्षराने जन्मणे प्रतीत होते. जसे अग्रज म्हणजे आधी जन्मलेला ( कुसुमाग्रज म्हणजे कुसुमच्या आधी जन्मलेला, तिचा मोठा भाऊ ). म्हणजे ह्या शब्दात आकाश आहे व जन्मणेही. ख पासून शब्दकोशात साधारण ७१ क्रियापदे आढळतात ( १) खंकारणे २) खंकाळणे ३) खंगणे ४) खंगाळणे ५) खचणे ६) खटखटणे ७) खंटणे ८) खटपटणे ९) खटारणे १०) खट्याळणे ११) खडखडणे १२) खडकवणे १३) खंडणे १४) खडबडणे १५) खडसणे १६) खडसाविणे १७) खणणे १८) खतावणे १९) खदखदणे २०) खपणे २१) खमकाविणे २२) खरकटणे २३) खरखरणे २४) खरडणे २५) खरवडणे २६) खर्चणे २७) खलबलणे २८) खवखवणे २९) खवणे ३०)खवळणे ३१) खसखसणे ३२) खळखळणे ३३) खाणे ३४) खाकरणे ३५) खाजणे ३६) खाजविणे ३७) खांडणे ३८) खाणणे ३९) खांदणे ४०) खापणे ४१) खारणे ४२) खालणे ४३) खालावणे ४४) खिचणे ४५) खिजविणे ४६) खिसणे ४७) खिळणे ४७) खिळविणे ४८) खुटखुटणे ४९) खुंटणे ५०) खुडखुडणे ५१) खुडणे ५२) खुणाविणे ५३) खुपणे ५४) खुपसणे ५५) खुरडणे ५६) खुरपणे ५७) खुलणे ५८) खुलविणे ५९) खेंकसणे ६०) खेंचणे ६१) खेटणे ६२) खेळणे ६३) खेळविणे ६४) खोकणे ६५) खोचणे ६६) खोडणे ६७) खोदणे ६८) खोलणे ६९) खोवणे ७०) खोळंबणे ७१) खोळंबविणे ). ह्या क्रियांपैकी खाजणे/खाजविणे ही क्रिया जास्त जबरदस्त आहे हे लगेच ओळखू येईल. हे कर्तब ख व ज चेच म्हणायला हवे.
------------------------------
आताशी लोकांना खरूज होत नाही म्हणून खरुजेचे भयंकर स्वरूप लक्षात येत नाही. पूर्वी गोवर, कांजण्या, देवी आलेल्या मुलांना अंगभर भयंकर फोड येत व त्याला इतकी खाज येई की मुले ती खाजविताना फोड फुटून अंगभर इन्फेक्शन होई, ताप येई. त्यावर उपाय म्हणून मुलांच्या हाताभोवती कापड गुंडाळून ठेवावे लागे. आजही बरेच  त्वचारोग हे अति-खाजवण्याने होतात हे कोणीही डॉक्टर सांगील. खाजवण्याच्या वरची पायरी म्हणजे कंड. ह्या शब्दातही पहा ड चा तिरस्कार कसा कारणी येतो. ----( आता म्हणशील, यापेक्षा उकरून काढलेली खाज बरी ! )

No comments:

Post a Comment