किती जगावे ?
----------------------
आजच्याच वर्तमानपत्रात एक बातमी आहे, सगळ्यात वयस्कर जिवंत माणूस कोण, त्यासंबंधी. आत्तापर्यंत १२२ वर्षाची एक बाई हे रेकोर्ड वागवून होती. आता तिला इंडोनेशिया इथल्या एका १४४ वर्षाच्या माणसाने मागे टाकले आहे. त्याचा जन्मच मुळी १८७० चा आहे. १८७० मध्ये म्हणजे किती किती मागे गेल्यासारखे वाटते ना !
महात्मा गांधीना म्हणतात की १२५ वर्षे जगायचे होते व त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. वयाची गंमत अशी की आपण ज्या वयाचे असतो त्यापेक्षा मोठी माणसे आपल्याला(च) दिसतात. जेव्हा आपण नुकतेच रिटायर होतो व संध्याकाळी बागेत फिरायला जातो तेव्हा आजूबाजूला सगळे ६०च्या पुढचे आहेत हे आपल्याला चक्क दिसतेच. आता मी ७५चा होतोय तर मला ८०-८५चे लोक आरामात दिसतातच. तसे माझ्यापेक्षा लहान असलेले मरताहेत हेही आहेच, पण ८५ हे तसे काही फार अवघड वय आहे असे आता वाटत नाहीय. जेव्हा ८५ला पोचेन तेव्हा कदाचित ९०च्या पुढचेही दिसायला लागतील. दमा दमाने वयाने वाढावे अशीच व्यवस्था दिसतेय.
का एव्हढे जगावे असे कोणी विचारले तर रास्त तर्क देणे अवघड आहे. पण वाढत्या वयात व ढासळत्या प्रकृतीत काय एन्जॉय करावे ते “टयूजडेज विथ मॉरी ” मध्ये तो ९०चा प्रोफेसर छान सांगतो. त्याला मस्क्युलर डीस्ट्रोफि हा स्नायूंचा रोग झालेला असतो त्यामुळे तो नुसता गोळा झालेला असतो. नर्स उचलून टॉयलेटला घेवून जाते, अशी गत. त्याची मुलाखत घ्यायला आलेली मुलगी विचारते की आता तुम्हाला कसे वाटतेय ? तो म्हणतो की खरे सांगू का,टॉयलेट झाल्यावर जे गरम पाण्यानी धुतले ना, तेव्हा खूप बरे वाटले ! काय सुख !
मध्ये मध्ये जेव्हा आपल्याला कंटाळा येतो व आपण कुठे तरी दूर दृष्टी लावून हरवतो, तेव्हा लोकांना वाटते, गेला कोमात ! ( पुणेकर जोमात ! ). कोण कोमात आहेत व कोण जोमात आहेत हे तपासायची काही तांत्रिक श्रेणी आहे का म्हणून तपास घेतला तर अशी एक ग्लासगो कोमा स्केल आहे म्हणतात. ह्यात आपण जर डोळे उघडले नाही तर ते सगळ्यात वाईट व त्याला मार्क ३. आपण जर काही बोललो नाही किंवा असंबद्ध बोललो तर तेही वाईट व त्याला मार्क ३. हात पायांची काही हालचाल नाही केली तर ते वाईट व त्याला मार्क ३. असे सगळे मिळून ९ मिळाले की आपण नापास व कोमात ! १५ ला पासिंग !
तेव्हा जोमात राहयचे तर उघडा डोळे, बडबडा काही, व हलवा हात पाय !
--------------------------------
No comments:
Post a Comment