-----------------
कोण ठरवील ? स्मृतिपर्ण की खुणेरी ?
----------------------------
एखाद्या भाषेत एखादा नवीन शब्द कसा येतो, रुळतो व ते कोण ठरवते हे पाहणे मोठे मनोरंजक आहे. आता एक उदाहरण घेऊयात, इंग्रजीतले "बुक-मार्क", म्हणजे पुस्तकातले खुणेचे पान जे वापरतात ते. मराठीतल्या पुस्तकातही हे पान वापरल्या जाते ( पूर्वीच्या जाड धार्मिक पुस्तकात एक रंगीत विणलेला दोरा ह्या कामी वापरत.) पण ह्या बुक-मार्कला मराठीत म्हणायचे काय ?
काही जणांनी वापरलेय स्मृतिपर्ण. कुठल्या पानापर्यंत वाचून झाले त्याची स्मृती ठेवण्यासाठी वापरलेले पान. छानच शब्द आहे. पण हा रुळेल ? कदाचित लोकांना तो संस्कृत-वाला वाटेल व साधे लोक तो दूरच ठेवतील.
इंग्रजीत मूळ शब्दाआधी प्रत्यय ( प्रिफिक्स ) व शब्दानंतर प्रत्यय ( सफिक्स ) लावून नवीन शब्द करायची पद्धत आहे. जसे: e-book ; pass-book ; log-book ; phone-book वगैरे, किंवा book-mark ; book-store ; book-shelf ; book-bank ; वगैरे. ह्या शब्दांमध्ये कसे book हे मूळ आहे, तसे ह्याचे मराठीत करताना जर पुस्तक/ग्रंथ केले तर मग करावे लागेल book-mark साठी : ग्रंथ-खुण ; पुस्तक-खुण, वाचन-खुण ; पान-खुण; शलाका खुण वगैरे. आता हे सुटसुटीत वाटत नाहीत, त्यामुळे रुळतील अशी शक्यता कमीच.
आता "खूण" हे मूळ ठेवावे असे वाटून ( खुणगाठ सारखे, पूर्वी म्हणे लोक लक्षात ठेवण्यापायी धोतराला कडेला गाठी मारीत तसे ) पर्यायी शब्द होऊ शकतात असे : खुणपान, खुणपृष्ठ, खुणेचे पान, खूण-पीस, खुणेरी, खुणकरी ; खुण-पान ; खुण-चट ; खुण-पत्र ; खुणपत्रिका ; खुणपर्ण ; खुणक ; खुणपे ; खुणकळ ; आठवचिठ्ठी ; (काही पुस्तकांना बुकमार्क म्हणून एक दोरा असतो. त्यासाठी : खुणसूत्र ; खुणदोर ; खुण-दोरा खुणधागा ;).
आता इतक्या पर्यायांपैकी किती लोकांना कोणता पर्याय रुचेल व ते कोणता पर्याय रुळवतील, हे ताडणे मोठे कठिण आहे.
-------------------------------------------
Tuesday, August 30, 2016
कोण ठरवील ? स्मृतिपर्ण की खुणेरी ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment