दिसणे .....एक प्रोजेक्शन !
----------------------------------------
मंगेश पाडगावकरांचे एक बालगीत आहे :
-----------------
सगळ्या पऱ्या
शेवटी होतात लठ्ठ
असे म्हणाला एक मठ्ठ
पऱ्यांनी दिला शाप
पुढच्या जन्मी झाला साप !
-------------------
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकताना प्रत्येकाचे आपल्या शरीराबद्दलचे काय भान असते ह्याबद्दल एक प्रयोग करून दाखवतात. प्रत्येकाला फरशीवर आपण काय आकाराचे आहोत त्याचे चित्र काढायला सांगतात खडूने. मग त्यावर झोपून पडताळा घ्यायचा की काढलेल्या चित्रापेक्षा आपण लहान आहोत की मोठे ? आपल्या ईगो मुळे बहुतेक सर्वच स्वतःचा आकार मोठाच काढतात असे अनुमान सर्वानुमते निघते.
हे जरी इगोचे कर्तब असले तरी चारचौघासारखे दिसावे असे वाटणे हे काही फार चुकीचे म्हणता येणार नाही. पण...काळा माणूस काळाच दिसतो व ते त्याला त्या त्या समाजाच्या समजुतीने ते खटकते. मी वेस्ट इंडीजला असताना, आमच्या ऑफिसात खूप बाया होत्या व त्या ठार काळ्या होत्या. पण एकीलाही त्याचे वैषम्य नव्हते. कारण तिथे “हम काले है तो क्या हुवा...” हे वाटणे आता खूपच सामाजिक झाले आहे. पण आपण काळे आहोत ही खंत जाता जात नाही हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. मग ही खंत जाते कशी ?
स्वर्गाचे वर्णन करणाऱ्या एका कादंबरीत असे कल्पिले होते की तुम्हाला ज्याला पहायचे आहे त्याची इच्छा असली तरच तुम्ही त्याला दिसू शकाल व तो तुम्हाला दिसेल. व असे म्हटले होते की शरीर हे शेवटी तुमच्या आत्म्याचे प्रोजेक्शन आहे. तुम्ही प्रोजेक्ट कराल तेव्हा दिसेल. आपले शरीर जेव्हा पाहण्यासारखे नसते तेव्हा ते प्रोजेक्टच करू नये असे आपल्याला वाटत असते. ते दिसूच नये असे वाटण्यासाठी काय करावे ?
तर दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीचा ध्यास घ्यावा. अगदी वेड्यासारखा. आणि हे वेड इतके ताणावे की दिसणे अगदी खिजगणतीतही येउ नये ! मग आपण आपल्याला दिसणार नाही !
---------------------------
No comments:
Post a Comment