------------------------------------
नकारात्मकतेचा कळस
---------------------------
मला जेव्हा ऍसिडिटीचा भयंकर त्रास होत असे तेव्हा मी पुण्याच्या नानल वैद्यांचे औषध घेत असे. त्यांचे तर्कशास्त्र मोठे अजब होते. ते म्हणायचे कोणते पदार्थ आपल्याला चालतात व कोणते चालत नाहीत हे आपले मनच ठरवत असते. त्यामुळे ज्या ज्या पदार्थांमुळे तुम्हाला ऍसिडिटी वाढतेय असे वाटतेय ते खाऊ नका. असे करीत करीत माझे दही, ताक, काकडी, लिंबू, तुरीची डाळ, बियर, आमटी, चहा, लस्सी, श्रीखंड, सरबतं, वगैरे पदार्थ तीन वर्षे बंद झाले. त्या दरम्यान मी नुसत्या उकडलेल्या भाज्या खात असे. एवढ्या कडक पथ्याने माझी ऍसिडीटी थोडीशी काबूत आली.
हे सांगण्याचे, आठवण्याचे कारण असे की आपले आजकालच्या वाचनात, पाहण्यात असेच होत असते. टीव्हीवर जेव्हा चर्चा चालू असते तेव्हा राजकारणी लोक जे अद्वातद्वा बोलत असतात ते एका मिनिटाच्यावर आजकाल ऐकवतच नाही. पटकन् चॅनेल आपण बदलतोच. मनमोहनसिंग हे तर पाहिल्याबरोबर ह्यांचे नावच कसे "मनमोहन" ठेवले त्या आईवडिलांची कींव येते. इतका मख्ख चेहरा दुसरा असूच शकत नाही. चॅनेल्स बदलण्यात जो आनंद मिळतो तो आजकाल कुठलेच चॅनेल पाहण्यात मिळत नाही, इतकी न-मनोरंजकता टीव्हीवर व्यापून राहिलेली आहे. वाचण्यातही तसेच. वर्तमानपत्रे पूर्वी किती तासन्-तास पुरायची वाचायला. मी टाइम्स ऑफ इंडिया पूर्वी टॉयलेटात वाचायचो, तेव्हा मला चांगला अर्धा तास तरी लागायचा. आताशी ह्या न वाचवण्यामुळे सकाळचे विधीही अंमळ लवकरच होतात. सरकारी योजनांच्या बातम्या असल्या की, मंत्र्यांची भाषणे असले की, संमेलनाध्यक्षांची भाषणे, अशा कितीतरी बाबी आपण छाटतोच. एवढेच काय आज संगणकाचेही जे काही वापरणे होते आहे ते छाटण्याच्या सोयीमुळेच. ईमेल मध्ये जो सोशल मेसेजेसचा कॉलम आहे तो तर न वाचताच, सेलेक्ट-ऑल करून डिलीट करण्यात जो छद्मी आनंद मिळतो त्याला तोड नाही. ( ह्याही पेक्षा खुनशी आनंद एखाद्याला ब्लॉक करताना होतोच.). तसेच फेसबुकावरच्या वाचण्याचे. धडधड स्क्रोल करीत जायचे. एखाद दुसरे ठिकाण थांबायचे. आजकाल तर मी संगणकावर एखादे ४०० पानी पुस्तकही असे दोन-चार तासात उडवतो. एक बोट डाऊन-ऍरोवर धरलेलेच असते. एकप्रकारे आपण सगळे विवेकानंदच होत आहोत ( विवेकानंद म्हणे पुस्तकाची पाने नुसती फरफर करीत व तेव्हढ्यात त्यांचे वाचून होई ).
एवढा सगळा नकारात्मकतेचा कल्लोळ चाललेला असताना लक्ष काय वेधून घेते ? तर, जिथे काही अपार नाट्य दडलेले आहे, अशी स्थळे. उदाहरणार्थ आजच्याच टाइम्स ऑफ इंडियातली ही बातमी तुम्ही वाचली असेल. इंग्लंडात म्हणे आशियाई ( प्रामुख्याने पाकीस्तानी, बांग्लादेशी व भारतीय, त्या उतरत्या श्रेणीने ) पालक मंडळी आपल्या मुलांमुलींवर लग्ने लादत आहेत, इंग्लंडला येऊन.प्रवासा-दरम्यान त्यांच्यावर कडक पाळत असते. त्यांना एकटे पडू देत नाहीत. त्यामुळे त्यात ज्या मुलांमुलींची होरपळ होतेय त्यांच्यासाठी एका एनजीओ ने एक युक्ती सांगितलीय. ती अशी की मुलाने/मुलीने अंडरवेअर मध्ये एक स्टीलचा चमचा ठेवायचा. विमानतळावर तपासणीदरम्यान कुंईSS वाजले की त्यांना सुरक्षा अधिकारी वेगळे घेऊन जातात. तेव्हा त्यांना मुलांनी/मुलींनी आपल्यावर लादलेल्या लग्नासंबंधी व त्याच्या विरोधासंबंधी सांगायचे. लगेच सोशल वर्कर येऊन पालकांविरुद्ध कारवाई होते वगैरे तपशील बातमीत दिलेले होते. केव्हढे नाट्य ! आणि केव्हढा जालीम उपाय ! असे काही वाचताना जे काही बातमीत लिहिलेले नाही ते सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. असलेच आगळे-वेगळे आजकाल वाचवते !
हे सगळे नकारात्मकतेच्या कळसालाच पोचल्यासारखे वाटेल, पण करता काय ? होते आहे असे हे मात्र खरे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे खुद्द देवाची व्याख्या करतानाही असेच नकारात्मक व्हावे लागते, हे बरे आहे. जसे नेति नेति, म्हणजे देव असा नाही, असा नाही असे म्हणतात ती नकारात्मकता. आता देवालाच अशी नकारात्मकता भोगावी लागतेय तिथे आपले काय ?
-------------------------------
No comments:
Post a Comment