बीभत्स गाळावा ?
--------------------------
पूर्वी आईवडिलांना पाच सहा मुले असली व सर्व चांगली असली की म्हणत “एकाला झाकावा व एकाला काढावा”. असेच आजकाल रसांच्या बाबतीत झालेय की काय ?
एव्हढे आठ नऊ रस, मग त्यात बीभत्स रस हवाय कशाला ? असे वाटणारे आपण एकटेच नाही आहोत. मराठी विश्वकोशातील हे टिपण पहा : “मराठी रसचर्चेत द. के. केळकर यांनी प्रथम बीभत्स रस गाळण्याची सूचना केली व के. ना. वाटवे यांनी बीभत्स व रौद्र यांची मान्यता काढून घेऊन यांच्या जागी भक्ती, वत्सल व शांत यांची जोड देऊन एकंदर रससंख्या नऊ केली. त्यानंतर कवी अनिल यांनी प्रक्षोभ आणि शं. द. जावडेकर यांनी क्रांती या रसांचाही पुरस्कार केला. सर्वसामान्य रसिकांची समजूत रस हे आठ वा नऊ असतात,अशीच असते.”
शिवाय असे पहा की सर्व कलांची राणी शोभावी अशी “चित्रकला”. त्यात असतात काहो बीभत्स चित्रं ? आपल्याकडचे कवी एव्हढे समर्थ की बीभत्स कवितात ते बीभत्स प्रतिमा साक्षात चितारतात. त्यातले काही तर स्वतः चित्रकारही असतात. तर मग बीभत्स चित्रे का नाही फारशी दिसत ? चित्रकारांना तर आजकाल वाट्टेल तशी चित्रे काढण्याची “आझादी” आहे, तर मग ते बीभत्स चित्रे का नाही काढीत ? अश्लील चित्रे जरूर आहेत, पण बीभत्स ?
“कला व नीती” ह्या प्रकरणाशेवटी पाटणकर, “सौंदर्य-मीमांसा ”त म्हणतात : “कलाकृती जीवनाला जितक्या जास्त गंभीरपणे सामोरी जाते तितकी तिच्यातली नैतिक बाजू महत्वाची होत जाते ”. ह्या निकषावर बीभत्स रस कुचकामाचा, भले त्याने अध्यात्म लपवले असेल !
मला वाटते हा बीभत्स रस हद्दपारच करावा !
----------------------------
No comments:
Post a Comment