Friday, August 19, 2016

चुप,चूप,गप,गुपचूप,चुपचाप...

--------------------------------------------------------
चुप, चूप, गप, गुपचूप, चुपचाप.....
--------------------------------------
चुप्‌, चूप्‌, चिप्‌, गप्‌, गुपचुप्‌, गुपचिप्‌, चुपचाप्‌, गपगार, गपगुमान्‌, अप्‌, ह्यांना व्याकरणात केवलप्रयोगी अव्यये म्हणतात, कारण ह्यांचा एकदम वाक्याच्या प्रारंभी उपयोग होतो व नंतर वाक्य येते. म्हणजे ह्यांचा प्रयोग केवळ करायचा म्हणून होतो. दाटून आलेल्या मौनदर्शक भावाची ही अव्यये होत.
शब्दकोशात हे शब्द हिंदी मधून आल्याचे नमूद करतात. गप बसवणारे हे शब्द नेमके प असलेलेच का असावेत ? प हा ओठांनी म्हणायचे अक्षर व बहुदा ते आपण उच्चारलेले पहिलेच अक्षर असावे. बाळ शब्द आहेत :  पा ; पपा ; पप्पा ; पा पा ; पंपम्‌ ; पिपिंम्‌ ; पंखा ; पिका बू ; वगैरे. बाळाच्या वाढीतला पहिला टप्पा म्हणजे त्याचे आईचे दूध पिणे किंवा वरचे दूध बाटलीने पिणे. हे पिणे खरे तर पिणे नसून चोखणे असते. त्यामुळे बाळाच्या स्वर-यंत्रातला महत्वाचा भाग म्हणजे ओठ आता हळू हळू बळकट होऊ लागतात. ओठांचे स्नायू आता जरा ताकदवान होऊन बाळाच्या मनाप्रमाणे हलू लागतात. कित्येक बाळे रडण्याच्या आधी ओठांचा जो केविलवाणा आकार करतात त्याला आपण "ओठ काढणे" असेच म्हणतो. हे ओठ काढणे हा बाळाला आलेला ओठांवरचा पहिला ताबा असतो. ह्या ओठांच्या बळकटीमुळे ओठांच्या सहाय्याने उच्चारणारे आवाज बाळ काढू लागले तर ते साहजिकच म्हणावे लागेल. म्हणूनच वरील पा; पा पा ( पाण्या साठी); पा ;पपा; पप्पा ( वडिलांसाठी ); पंपम्‌ ; पिपिंम्‌ ( कारच्या हॉर्न साठी ) ; पंखा ( अति सानिध्यामुळे हा बहुतेक पहिला जिन्न्स लहान मुले ओळखायला शिकतात ) ; पिका बू ( इंग्रजी माध्यमा मुळे भोकाडीचा पर्याय म्हणून ) हे बाळ-शब्द लहान मूल अगदी पहिले वहिले शब्द म्हणून शिकते. आपला जो अवयव बोलण्यासाठी प्रथम तयार होतो तो म्हणजे ओठ. लहान मुलांचे ओठ हे चोखण्याने तयार होतात व त्यामुळे त्यांचा पहिला उच्चार ओठाने व्हावा हे साहजिकच आहे.
ह्या प चा संस्कृत धातूचा अर्थ पालन करणे, पालन करणारा असा असल्याने बहुतेक भाषात पप्पा, पापा, फादर, असे ओठांनीच उच्चारायचे शब्द वडिलांसाठी ( पालक ) आहेत असे आढळते. ह्या दृष्टीने खरे तर प चा अर्थ बोलण्याकडे झुकायला हवा. पण इथे आपण कोणाला चुप रहा, गप रहा असे म्हणण्यासाठी प वापरीत आहोत. अर्थाची नेहमी दोन टोके उपलब्ध असतात त्याचीच इथे प्रचीती येते. पाहिजे तर बोलण्यासाठी प वापरा वा पाहिजे तर चुप बसवण्यासाठी !
-----------------------------------------

No comments:

Post a Comment