Thursday, August 18, 2016

स्फूर्ती

-----------------------------------

स्फूर्ती, उ:त्साहाची जननी

-------------------------------

      फसफसणारा उत्साह दाखविणारा शब्द आहे स्फूर्ती. ही येण्यासाठी सगळे लेखक, कवी,चित्रकार, कलाकार वगैरे मंडळी अहोरात्र वाट पाहात असतात. असा हा सृजन घडवून आणणारा शब्द : स्फूर्ती.

      ह्यात स आल्यामुळे एकप्रकारची सकारात्मकता येते, तसेच "र्ती" मुळे काही तरी नक्की असे मूर्ती सारखे सुचणार ह्याची ग्वाही वाटते. पण खरी कमाल करते ते स्फूर्ती मधले फ हे अक्षर. आणि ते हे करते तेही अर्धे असूनही. इतकी ह्या फ ची ताकद ! खोटं वाटत असेल तर स्फ पासूनचे इतर काही शब्द पहा : स्फटिक ; स्फीती ( प्रतिष्ठा, प्रशंसा ) ; स्फुंज ( गर्व ) ; स्फुंदणे ;स्फुंजणे ; स्फूट ( स्पष्ट) ; स्फुंद ; स्फुंदणे ; स्फुरण ;स्फुरद ( ज्वालाग्राही पदार्थ )  ; स्फुल्लिंग ; स्फोट; स्फोटक ;

      स्फ पासूनचे एवढेच शब्द आहेत आणि सगळे कसे स्फूर्तीने ओथंबलेले आहेत. एवढेच काय स्फुरद हे नाव एक ज्वालाग्राही पदार्थाला द्यावे ह्या मागेही स्फुरणार्‍याचे कौतुक करण्यासारखे आहे.

      स्फूर्तीची जननी जणु काही "उत्साह" आहे असे समजून तो शब्द तपासू. मुळात "उ" ह्या अक्षराविषयी अशी नोंद आहे की हे नापसंती वा तिरस्कार दाखवणारे उद‌गारवाचक अव्यय आहे. ह्या नापसंतीला जो साहतो त्यालाच खरे तर "उत्साह" म्हणणे हे शब्दप्रभूंचे अध्यात्मच दाखवणारे आहे. "उ" मुळे नकारात्मक अर्थ येतो का म्हणून एकूण उ-पासून सुरू होणारे १२४८ शब्द तपासले तर त्यापैकी २५८ म्हणजे २०% शब्द नकारी दिसले. हे प्रमाण फारच प्रभावाचे आहे ( जरी २० टक्के जरा कमी वाटत असले तरी ! ). काही उ-पासूनचे शब्द पहा ( वानगी-दाखल ) : उकिरडा ; उकाडा ; उखाळीपाखाळी ; उगीच ;उचकणे ; उचका ; उच्छाद ; उजाड ; उट्टे ; उडत ( गेला उडत ! ) ; उठाठेव ; उंडारणे ; उणे ; उतणे ;उतू येणे ; उताडा ; उतावळ ; उद्दाम ; उद्धट ;उधार ; उन्माद ; उपमर्द ; उपरती ; उप-(पंतप्रधान वगैरे ) ; उफराटा ; उसवण ...वगैरे. ( अर्थात ह्याला काही सन्माननीय अपवादही आहेत. जसे : उत्साह; उत्पन्न ; उत्कृष्ट ; उदार ; उतराई ; उदो ;  वगैरे )

      गंमत म्हणजे तंत्रशास्त्रात उ ह्या अक्षराचे तत्व इच्छाशक्ती असे आहे, जे स्फूर्तीदेवता पावायला आवश्यक असेच आहे.

----------------------------------

No comments:

Post a Comment