सुफल सम्प्रूण ( संपूर्ण )
-------------------------------------
माझ्याकडे काशिनाथ अनंत जोशी ह्यांनी लिहिलेले “संपूर्ण चातुर्मास” हे पुस्तक आहे. त्यावरून मला असे कळले ते असे :
कहाण्या हा आपल्या लोकवाङगमयाचा प्रकार आहे. त्याला अभिजात ललित वाङगमय हा दर्जा मिळतो. हे मौखिक वाङगमय असल्याने ते म्हणण्याचा प्रकार आहे.
कहाण्यांची सुरुवात एक आटपाट नगर होते अशी असते. त्यात आट म्हणजे रुंद व पाट म्हणजे लांब असा अर्थ आहे. आपले पौराणिक वाङगमय हे उत्तरांच्या स्वरूपात असल्याने कोणीतरी प्रश्न विचारला व त्याचे उत्तर दिले असे स्वरूप असते. श्रद्धेने आचरणाऱ्या व्रतात काय फळ मिळते ते कहाण्यांच्या निमित्ताने सांगतात. ज्या कहाण्या नंतर सोयीसाठी संक्षिप्त केलेल्या आहेत त्यांची फलनिष्पत्ती पाच उत्तरात सांगितलेली आहे. त्यामुळे बहुतेक कहाण्यांचा शेवट हा “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्प्रूण ” असा असतो . गणपतीची कहाणी संक्षिप्त केलेली नसल्याने तिचा शेवट “पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल सम्प्रूण ” असेच सांगतात.
सम्प्रूण च्या पुढे कंसात संपूर्ण असे लिहिलेले असते. त्यावरून संपूर्णच बरोबर असावे असे आपण समजतो. लोकांना “संपूर्ण” म्हणणे ( “संप्रूण” पेक्षा ) जास्त सोपे जावे असाच हा उच्चार आहे. तरी मग सम्प्रूण लिहिण्याची पद्धत का केली असावी ?
“एखाद्या पदार्थात पदार्थ विरघळण्याची परिसीमा झालेला द्रव” अशा अर्थाचा एक शब्द आहे “संपृक्त”. कदाचित हे केलेले व्रत व त्याला मिळणारे फळ हे नुसतेच संपूर्ण नव्हे तर संपृक्त असावे असे कोणी कहाणीकाराने म्हणणे हे जास्त लालित्यपूर्ण ठरावे व त्यामुळेच “संपृक्त” अर्थाने संपूर्ण म्हटले गेले असावे. अर्थात हे सगळे मौखिक असल्याने पुरावा दाखवा असे कोणी विचारल्यास ह्याच उत्तरी ते “सम्प्रूण” झाल्याचे समजावे !
----------------------------
No comments:
Post a Comment